पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने नवीन पाणीपट्टी दर निश्चित केले आहे. सत्ताधारी त्याचा मोठा गाजावाजा करत शहरवासियांना मोफत ६ हजार लीटर पाणी देण्याची घोषणा केली. मुळात पाणीपट्टीत मोठी दरवाढ नागरिकांच्या माथी मारण्याचे कारस्थान सत्ताधारी भाजप करीत आहे. दरमहा शंभर रुपये पाणीपट्टी शुल्क प्रतिकुटुंब केलेले असताना, दरमहा सहा हजार लीटरपर्यंत पाणी मोफत कसे? असा सवाल करत ही वाढीव दरवाढ रद्द करण्याचे आवाहन शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर यांनी महापौर नितीन काळजे यांना निवेदनातून केला आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, ६ हजार लिटरपर्यंत पाणी मोफत अशी घोषणा करत असताना दरमहा प्रतिकुटुंब निश्चित केलेले शंभर रुपये पाणीपट्टीशुल्क सोयीस्कररित्या लपविले हा भाजपच्या पारदर्शक कारभाराचा नमुनाच म्हटला पाहिजे. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पिंपरी चिंचवडकरांना खूष करण्यासाठी भाजपने खोटे बोला पण रेटून बोला हा नमुनाच सादर केला आहे. ४२५ कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या टेंडर ग्रामीण झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी स्थायी समितीच्या अध्यक्षांनी सर्व प्रसारमाध्यमांना प्रजासत्ताकदिनाची भेट म्हणून सहा हजार लीटरपर्यंत मोफत पिण्याचे पाणी अशी घोषणा केली. एवढे कमी होते की काय, मोफत पाणी देणारी राज्यातील पहिली महानगरपालिका म्हणून त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे.
स्थायी समितीने नवीन दरमहा पाणीपट्टीचे दर निश्चित करताना नागरिकांची कशी फसवणूक केली आहे. हे निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यात म्हटले आहे, पाण्याचा प्रतिकुटुंब वापर निश्चित करताना सध्याच्या दरपत्रकाप्रमाणे १ ते तीस हजार लीटरपर्यंत प्रति २.५० रुपये प्रति एक हजार लीटर हा दर आहे. पाच व्यक्तीच्या कुटुंबाने दरमहा २० हजार २५० लीटर पाणी वापरल्यास, दरमहा येणारा पाणीपट्टीचा खर्च ५१.२५ रुपये येतो. हा सध्या प्रतिकुटुंब दरमहा कुठलेही शुल्क नाही. तसेच स्थायी समितीने निश्चित केलेल्या नवीन दरमहा पाणीपट्टी दराप्रमाणे पाच व्यक्तीच्या कुटुंबासाठी दरमहा पाणीपट्टीसाठी येणारा खर्च २३७.६२ इतका आहे. यावरुन फसव्या सवलती जाहीर करून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.
त्यामुळे शिवसेना या फसव्या योजनेचा निषेध करते आणि महापौरांना आवाहन करत आहे की स्थायी समितीने केलेले ठराव फेटाळून पाणीपट्टीची आकारणी पूर्वीप्रमाणेच करावी अन्यथा शिवसेना या दरवाढीचा तीव्र विरोध करेल.






















Join Our Whatsapp Group