गतवर्षीप्रमाणेच बचत गटातील महिलांमार्फत यंदाही बिलाचे हाेणार वाटप; महिला आर्थिक विकास महामंडळाकडे दिली जबाबदारी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने गतवर्षीप्रमाणेच 2024-25 या आर्थिक वर्षात महिला बचत गटातील महिलांमार्फत मालमत्ता कराची बिले वाटपासाठी सिध्दी 2.0 हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी हा प्रकल्प यशस्वी झाल्यामुळेच पहिल्या तीन महिन्यात 50 टक्के मालमत्ता कर वसूल झाला हाेता. बचत गटातील महिलांना राेजगार उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम हाती घेतला आहे.
शहरात 6 लाख 25 हजार निवासी, व्यावसायिक, औद्याेगिकसह इतर मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांना महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने कराची आकारणी केली जाते. गतवर्षी या मालमत्ता धारकांना महिला बचत गटाच्या माध्यातून घराेघरी बिले पोच करण्याचा महत्वाचा निर्णय महापालिकेने घेतला हाेता. अवघ्या दिड महिन्यात पालिकेच्या इतिहासात प्रथमच 100 टक्के मालमत्ता धारकांना बिले घरपाेच मिळाली हाेती. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच मालमत्ता धारकांनी विविध कर सवलतींचा लाभ घेवून 447 काेटी रूपये म्हणजे 50 टक्के मालमत्ता कर वसूल करण्यात या विभागाला यश आले हाेते.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिलांवर महापालिकेने टाकलेला विश्वास गतवर्षी सार्थ ठरविल्यामुळे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुन्हा एकदा मालमत्ता कराच्या बिलांचे वाटप बचत गटातील महिलांकडे साेपविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाला सिध्दी 2.0 प्रकल्प असे नाव देण्यात आलेले आहे. या प्रकल्पाचे समन्वयन व पर्यवेक्षण राज्य शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास महामंडळाकडे साेपविण्यात आले आहे.
बचत गटातील महिलांना प्रशिक्षण..
मालमत्ता करांची बिले वाटपासंदर्भात महिलांना कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण माेरे प्रेक्षागृहात 2 एप्रिल राेजी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कर संकलन विभागाचे सर्व प्रशासन अधिकारी, सहायक मंडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. या प्रशिक्षणामध्ये महिलांना मालमत्ता कराविषयी मुलभूत माहिती, बिल नेमके कसे असते, बिलांमध्ये काेण-काेणत्या बाबींचा समावेश असताे, याची इत्भुंत माहिती देण्यात आली. सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी गतवर्षी राबविलेल्या उपक्रमाचे झालेले फायदे, आलेल्या अडचणी या संदर्भात मार्गदर्शन केले. गतवर्षीच्या अडचणी पुन्हा येऊ नये, यासाठी काय उपाय याेजना करण्यात येत आहेत, याचीही चर्चा करण्यात आली. त्याचबराेबर प्रत्येक महिलेला दाेन हजारपेक्षा जास्त बिले वाटपाचे काम देण्यात येणार नाही. जेणेकरून सर्व महिलांना बिल वाटपाचे मानधनाची रक्कम समान मिळेल.
एका बिलासाठी महिलांना मिळणार 20 रूपये..
मालमत्ता कराचे बिल वाटण्यासाठी महापालिकेच्या वतीने महिलांना गतवर्षी एका बिलासाठी 15 रूपये देण्यात आले हाेते. मात्र, यंदा यामध्ये वाढ करून प्रत्येक बिलासाठी 20 रूपये देण्यात येणार आहेत. यावर्षी देखील सिध्दी ॲपच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. यावेळचे सिध्दी ॲप गुगल प्ले स्टाेअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिलांनी मालमत्तेचा माेबाईल क्रमांक हा एसएमएस पाठविण्याच्या दृष्टीने व सर्व सेवा ऑनलाइन मिळण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. पालिकेच्या सर्व सेवा ओटीपी बेस असल्यामुळे मालमत्ता धारकाने आपला अचूक माेबाईल नंबर देणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदा ॲपमधून प्रत्येक मालमत्तेचा माेबाईल क्रमांक ओटीपीव्दारे शहानिशा केला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त माेबाईल क्रमांक मिळण्यास आणि नागरिकांचा व्यक्तिगत डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत हाेणार आहे. यंदाही पहिल्या तिमाहीत पाचशे ते साडे पाचशे काेटी रूपयांपर्यंत मालमत्ता कर वसूल हाेईल, अशी आशा सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
बिलांचे वाटप दिड महिन्यात पूर्ण हाेणार ..
गतवर्षी कर संकलन विभागाने पालिकेच्या इतिहासातील 977 काेटी 50 लाख रूपयांचा कर वसूल केला आहे. आगामी वर्षात नवीन उच्चांक गाठण्यासाठी 2024-25 च्या आर्थिक वर्षाला सुरूवात हाेताच सहायक आयुक्त नीलेश देशमुख आणि त्यांची टीम कार्यरत झाली आहे. त्यानुसार मालमत्तेची काेरी बिले ही छपाईसाठी गेली असून ती बिले 10 एप्रिलपर्यंत कर संकलन विभागाला मिळणार आहेत. दि. 10 ते 15 एप्रिल या कालावधीत दाेन-दाेन हजार बिलांचे गठ्ठे करण्यात येणार आहेत. त्यानंतर ती बिले बचत गटातील महिलांकडे सुपूर्द केली जाणार आहेत. बिलांचे वाटप दि. 15 एप्रिल ते 31 मे या कालावधीत करण्यात येणार आहे.
गतवर्षी सिध्दी प्रकल्पाचा महापालिकेला माेठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. गतवर्षी तब्बल साडेतीनशेपेक्षा जास्त महिलांना अवघ्या दिड महिन्यामध्ये माेठ्या प्रमाणावर राेजगार मिळाला. बचत गटातील महिलांना पारंपारिक क्षेत्रे साेडून हे एक राेजगाराचे नवे दालन पालिकेने खुले केले. यंदाही आम्ही सिध्दी 2.0 प्रकल्प राबविणार आहाेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून ॲपमध्ये मालमत्ता धारकाचा माेबाईल क्रमांक पडताळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बिल दिल्यानंतर नागरिकांचा माेबाईल क्रमांक ॲपमध्ये टाकल्यानंतर एक ओटीपी संबंधित मालमत्ता धारकांना जाईल. ताे ओटीपी ॲपमध्ये टाकल्यानंतर ताे माेबाईल क्रमांक व्हेरिफाय हाेईल. त्यामुळे पालिकेच्या डेटाबेसमध्ये सध्या अनेक माेबाईल क्रमांक हे चुकीचे आहेत किंवा क्रमांकच नाहीत. हा सर्व प्रकार बंद हाेईल. त्याचबराेबर नागरिकांना महापालिकेच्या सर्व ऑनलाइन सेवा ओटीपी बेस मिळणार आहेत. सेवेमध्ये तत्परता, पारदर्शकता वाढेल. नागरिकांची व्यक्तिगत माहिती सुरक्षित राहण्यास मदत हाेईल. नागरिकांनी माेबाईल क्रमांकाची पडताळणी करावी.– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महापालिका
Tags: कर संकलन विभागपिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड महापालिकामालमत्ता कर बिल वाटप प्रशिक्षणसिध्दी 2.0 प्रकल्पसिध्दी 2.0 हा प्रकल्प