पिंपरी (Pclive7.com):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे २०२५ रोजी त्रिशताब्दी जयंतीचे (३०० वी जयंती) औचित्य साधून त्यांचे समाजा प्रती कार्य आणि त्याग भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा महोत्सव राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात साजरा करण्याचा मानस राज्य सरकारने हाती घेतला आहे. त्या संदर्भात दि.६ मे २०२५ रोजी चोंडी (अहिल्यादेवी नगर) या त्यांच्या गावी येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कॅबिनेट बैठकीत महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर विशेषतः पिंपरी-चिंचवड शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचा निधी वाढवून मोठ्या थाटात साजरी करण्यात यावी, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.
या संदर्भात बोलताना आमदार गोरखे म्हणाले, “अहिल्यादेवी होळकर या केवळ एक राजमाता नव्हत्या, तर त्या एक आदर्श शासिका, समाज सुधारक आणि जनतेच्या हितासाठी कार्य करणाऱ्या महान स्त्री होत्या. त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करणे ही काळाची गरज आहे.”

या जयंती वर्षानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, महिला सक्षमीकरणासाठी विशेष मोहीम तसेच त्यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना त्यांनी आयुक्तांना दिल्या.
या जयंतीचे औचित्य साधून शहरातील तरुण पिढीला अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी कार्याची ओळख करून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, व दरवर्षीचा असलेला १ लाख रुपये निधी यावर्षी साठी ५० लाख करण्यात यावा असेही आमदार अमित गोरखे यांनी नमूद केले आहे.























Join Our Whatsapp Group