मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरावर गौरव; जनतेत आनंदाचे वातावरण
मावळ (Pclive7.com):- मावळचे आमदार सुनील शेळके यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी तालिका अध्यक्षपदी (Panel of Chairpersons) निवड झाल्याने मावळ तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आमदार सुनील शेळके हे मावळ मतदारसंघातून सलग दोन वेळा प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी मावळच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीतही त्यांनी एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवत आपला जनाधार अधिक भक्कम असल्याचे सिद्ध केले.

मावळ तालुक्यात विकासकामांचा मोठा धडाका लावणारे आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. रस्ते, पाणीपुरवठा योजना, आरोग्य सुविधा, शैक्षणिक विकास, पर्यटनवाढीसाठी विविध प्रकल्प तसेच लोणावळा परिसरातील स्कायवॉकसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी मावळच्या विकासाला गती दिली आहे. त्यामुळेच त्यांना ‘विकासपुरुष’ म्हणूनही संबोधले जाते.

विधिमंडळातील तालिका अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे मानले जाते. सभागृहाचे कामकाज सुरळीत व शिस्तबद्ध पद्धतीने चालावे यासाठी अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांच्या अनुपस्थितीत तालिका अध्यक्ष सभागृहाचे संचालन करतात. सभागृहातील चर्चा, नियमांचे पालन, सदस्यांना बोलण्याची संधी देणे तसेच कामकाजाचे प्रभावी व्यवस्थापन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या पदावर असते. त्यामुळे हे पद लोकप्रतिनिधीच्या संसदीय अनुभवाची, अभ्यासू वृत्तीची आणि नेतृत्वक्षमतेची दखल घेणारे मानाचे पद समजले जाते.
आमदार सुनील शेळके यांच्या या निवडीमुळे मावळ तालुक्याच्या राजकीय प्रतिष्ठेत भर पडली असून राज्याच्या विधिमंडळात मावळच्या नेतृत्वाला विशेष स्थान मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत असून मावळ तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.




















Join Our Whatsapp Group