पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या “टी-२०” क्रिकेट स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पार पडले. पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनने प्रथमच आयोजित केलेल्या ऑक्सिरीच पुरस्कृत पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग “टी-२०” क्रिकेट स्पर्धेचा ऑक्शन (लिलाव) समारंभ सिझन्स बँक्वेट हॉल येथे पार पडला. ही स्पर्धा १५ मे ते २५ मे २०२५ या दरम्यान फोर स्टार क्रिकेट मैदान, हिंजवडी येथे होणार आहे.

ऑक्शन (लिलाव) कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक प्रदीप वाघ यांनी तर स्पर्धेविषयी संपूर्ण माहिती विजय कोतवाल यांनी दिली. प्रीमियर लीगसाठी नोंदणी केलेल्या पिंपरी चिंचवड परिसरातील १३९ खेळाडूंचा लिलावच्या कार्यक्रमात निलेश नातू यांनी आपल्या ओघवत्या भाषेने रंगत आणली. हा कार्यक्रम खूपच चांगल्या प्रकारे संपन्न झाला. यावेळी आपल्या पसंतीचा खेळाडू निवडण्यासाठी सर्व संघ मालकांनी चढाओढीने बोली लावत उपलब्ध असलेल्या खेळाडूतून आपल्या पसंतीचे खेळाडू निवडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व संघ मालक व त्यांचे आयकॉन खेळाडू यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या लिलावात संघमालक संजय बारणे (बारणे क्रिकेट अकॅडमी), विजय आसवाणी (श्री आसवाणी डेअरडेव्हिल्स), रवी शेट्टी (बंट्स वॉरियर्स), कुंदन जाचक (विश्व टायगर्स), प्रवीण बनसोडे (छत्रपती संभाजी किंग्ज), विजय कापसे (पिंपरी पॅंथर्स), सुदाम मोरे (मोरे पाटील पॅकर्स ) व राजेश पवार (ऑक्सिरीच) अशा आठ संघमालकांनी भाग घेतला. या ऑक्शन (लिलाव) करिता मावळचे लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे हे उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी क्रिकेट स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण केले व प्रत्येक संघ मालकाकडे टी-शर्ट सुपूर्त केले.

याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड मध्ये प्रथमच अशा टी- स्पर्धेचे आयोजन होत आहे. परिसरातील सर्व खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा. स्पर्धेद्वारे उदयोन्मुख खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मिळणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व खेळाडूंना एकत्र आणणे व त्यांना प्रोत्साहन देण्याच्या अपेक्षित कार्याबद्दल असोसिएशनचे आभार. पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या कार्याबद्दल आनंद व्यक्त केला व सहभागी खेळाडूं व असोसिएशनला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी म्हणाले की, ही स्पर्धा क्रिकेट मानसिक आणि शारीरिक कौशल्य वाढवते व खेळाडूला स्पर्धात्मक जीवन जगण्यास मदत करते.
पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेचे आयोजन सचिव राजू कोतवाल व उपाध्यक्ष वसंत भाऊ कोकणे यांनी केले व त्यांना या कामी विजय कोतवाल, प्रशांत तेलंगे, मुकेश गुजराथी, प्रदीप वाघ, युसुफ बरहाणंपुरे व संजय शिंदे सहकार्य केले. या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, उपाध्यक्ष वसंतभाऊ कोकणे, सचिव राजू कोतवाल, सहसचिव दिलीपसिंह मोहिते, खजिनदार संजय शिंदे, सदस्य विजय कोतवाल, प्रदीप वाघ, मुकेश गुजराथी, युसुफ बरहाणंपुरे, प्रशांत तेलंगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप वाघ यांनी शेवटी आभार प्रदर्शन संजय शिंदे यांनी केले.