पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जाण्याचे आदेश असताना पोलिस अंमलदाराने जाणीवपूर्वक आजारी असल्याबाबत खोटे कारण दिले. बंदोबस्तासाठी गैरहजर राहणाऱ्या आणि वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अंमलदाराला तडकाफडकी निलंबित केल्याचे आदेश अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहेत.

वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष..
भूषण अनिल चिंचोलीकर (नेमणूक, मुख्यालय, पिंपरी-चिंचवड) असे निलंबित केलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. राज्याचे पोलिस महासंचालक यांच्या कार्यालयीन आदेशानुसार, १२ ते २१ एप्रिल २०२४ या कालावधीसाठी लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोलीला जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील ५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याबाबत आदेश प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने या बंदोबस्तासाठी ५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामध्ये चिंचोलीकर यांचाही समावेश होता. दरम्यान, १० एप्रिल रोजी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची मुख्यालयात हजेरी घेतली असता चिंचोलीकर तेथे गैरहजर होते. फोनवरून त्यांनी आजारी असल्याचे मुख्यालयास कळविले. त्यांच्या आजारपणाबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चिंचोलीकर हे जुलाब, उलटी, ताप, पोटदुखीचा त्रास होत असल्याने औषधोपचारासाठी आपल्याकडे वैद्यकीय तपासणीसाठी आले होते, असे सांगितले. तसेच, त्यांना ॲडमिट करून घेऊन तपासण्या करण्यास सांगितले होते. मात्र, यांनी कोणत्याही तपासण्या केल्या नाहीत. तसेच, चिंचोलीकर यांना होत असलेला त्रास हा गंभीर स्वरूपाचा नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तासाठी नेमणूक केलेली असतानाही जाणीवपूर्वक आजारी असल्याबाबत खोटे कारण सांगून बंदोबस्त चुकविण्यासाठी चिंचोलीकर गैरहजर राहिले. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आदेशाची अवहेलना केली. तसेच, कर्तव्यात गंभीर स्वरूपाची कसुरी केली. त्यांचे हे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार व निष्काळजीपणाचे असल्याचे निदर्शनास चिंचोलीकर कारवाई आले आहे. त्यामुळे, यांच्यावर निलंबनाची करण्याचे आदेश अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहेत.
























Join Our Whatsapp Group