पुणे (Pclive7.com):- कल्याणी नगर अपघात प्रकरण ताजे असतानाच पुण्यात मद्यधुंद मोटर चालकाकडून अपघाताचा आणखी एक प्रकार घडला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील मोटारीला मद्यधुंद मोटरचालकाने धडक दिली. त्यामधून पाटील हे बचावले. संबंधित मोटार चालकासह त्याचे तीन मित्र आणि दोन मैत्रिणींना कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चंद्रकांत पाटील हे रात्री गणेश मंडळांना भेटी देऊन निघाले असताना कोथरूड परिसरात मोटार चालकाने धडक दिली. त्यामध्ये पाटील हे बचावले. पोलिसांनी तातडीने संबंधित मोटार चालक आणि मोटारीमध्ये असलेले त्याचे तीन मित्र आणि दोन मैत्रिणींना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी मोटारचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणानंतर पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. मात्र, तरीही असे प्रकार घडत असल्याचे या अपघात प्रकरणानंतर उघडकीस आले आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये संबंधित मोटारचालक अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आई, ससूनमधील डॉक्टर यांच्यावर कारवाई झाली आहे.