चिंचवड (Pclive7.com):- आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवड मधून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याची चर्चा सध्या चांगलीच रंगू लागली आहे. दरम्यान हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटणार की ठाकरे यांच्या शिवसेनेला याबाबत कोणताही निर्णय झाला नसला तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे आणि शिवसेना नेते राहुल कलाटे यांच्यात उमेदवारीवरून चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. या दोन्ही इच्छुकांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीआणि महायुतीत उमेदवारीवरून तिढा निर्माण झाला आहे. जागावाटपावरून राजकारण रंगत असल्याचे बघायला मिळत आहे. भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्यासह भाजपमधील शहराध्यक्ष शंकर जगताप, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते आदी इच्छुक उमेदवार आहेत. असे असताना आता महायुती मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाना काटे हे देखील इच्छुक आहेत. ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. काटे हे शरद पवार गटात जाण्यासाठी फिल्डिंग लावत असल्याची चर्चा आहे.

तसेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकित अपक्ष लढणारे शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभेची तयारी सुरू केली आहे. परंतु, कलाटे यांचा अद्याप पक्ष ठरलेला नाही. कलाटे यांना पक्षाच्या खंबीर साथीची अपेक्षा आहे. त्यांनी काही नेत्यांच्या भेटी घेत असल्याची माहिती देखील मिळत आहे. मतदार संघातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे ही निवडणूक ते लढणारच आहेत, मात्र कोणत्या चिन्हावर लढणार हे लवकरच स्पष्ट होईल असे देखील राहुल कलाटे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
त्यामुळे आता चिंचवडची जागा महाविकास आघाडीत कोणाला सुटणार? पवारांच्या तुतारीला की ठाकरेंच्या मशालीला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्याकडून तशी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. आता नेमकी जागा कोणाला सुटणार आणि उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



















Join Our Whatsapp Group