पिंपरी (Pclive7.com):- भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या ओजस्वी विचारांनी आणि स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्वाने करोडो भारतीयांच्या मनात राष्ट्राभिमान चेतवला आहे. आजच्या दिवशी त्यांच्या विचारधारांचा वारसा जपत देशाच्या प्रगतीसाठी काम करण्याचा दृढनिश्चय करून अटलजींच्या विचारांचे पालन करीत कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. काव्यात्मक भावनेची आणि राजकीय दूरदृष्टीची साक्ष देणारे अटलजी सदैव आमच्या मनात जिवंत राहतील, अशी भावना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केली.
भारताचे माजी पंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमचे प्रेरणास्त्रोत, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या आज १०० वी जयंतीनिमित्त पिंपरी भाजपा मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी आदरांजली व्यक्त करतांना जगताप बोलत होते.
यावेळी आमदार महेशदादा लांडगे, विधानपरिषद आमदार अमित गोरखे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, महेश कुलकर्णी, मोरेश्वर शेडगे, माजी महापौर राहुल जाधव, कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, जिल्हा उपाध्यक्ष रवी देशपांडे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, मंडल अध्यक्ष निलेश अष्टेकर, सहसंयोजक कायदा आघाडी दत्ता झुळूक, ओबीसी मोर्चाचे कैलास सानप, बेटी बचाव बेटी पढाओ अध्यक्ष प्रीती कामतीकर, भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष गणेश ढाकणे, माजी सैनिक प्रकोष्ठ संयोजक देविदास साबळे, मंगेश धाडगे, गणेश ढोरे, दीपक नागरगोजे, देवदत्त लांडे, दीपक भंडारी, सीमा चव्हाण, जयश्री मकवाना आदी उपस्थित होते.
शंकर जगताप पुढे म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 25 डिसेंबर रोजी भारतात सुशासन दिन साजरा केला जातो. 2015 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला होता. यानंतर मोदी सरकारने वाजपेयींची जयंती सुशासन दिन म्हणून साजरी करण्याची घोषणा केली. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना सरकारच्या पारदर्शकतेची आणि जबाबदारीची जाणीव करून देणे असून त्याचे उद्दिष्ट चांगले प्रशासकीय कामकाज आणि नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे हा आहे, असेही त्यांनी सांगितले.