पिंपरी (Pclive7.com):- मुलगी झाल्याच्या कारणावरून पती आणि सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. विवाहिता महाराष्ट्रीयन असून पती परप्रांतीय आहे. विवाहिता तिच्या मुलीसोबत मराठी बोलत असल्याने देखील तिचा छळ करण्यात आला. हा प्रकार सन २०१९ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत पिंपरी येथे घडला.
याप्रकरणी २७ वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती नवरंग श्रीवास, दशरथ नरसिंग सविता, अजय नरसिंग सविता, प्रियंका अजय सविता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी कि, फिर्यादी विवाहिता महाराष्ट्रीयन आहे. तर आरोपी पती परप्रांतीय आहे. विवाहिता नवरंग याच्या भावाच्या दुकानात काम करत असताना तिची नवरंग सोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी आळंदी येथे प्रेमविवाह केला. विवाहितेने एका मुलीला जन्म दिला. मुलगी झाल्याने नवरंग आणि त्याच्या कुटुंबीयांनी विवाहितेचा छळ केला.
त्यानंतर मुलीचा खर्च म्हणून माहेरहून २५ लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यावरून विवाहितेला मारहाण केली. विवाहिता तिच्या मुलीसोबत मराठी भाषेत बोलते या कारणावरून सासरच्या लोकांनी तिचा अपमान करून घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली. तसेच पती दररोज रात्री दारू पिऊन काही कारण नसताना विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन देशमुख व हेड कॉन्स्टेबल रवींद्र पवार पुढील तपास करीत आहेत.