नवी दिल्ली (Pclive7.com):- भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. वृद्धापकाळाने त्यांची दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे आज (दि.२७) आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.
मनमोहन सिंग यांना गुरुवारी रात्री ८ वाजता आपत्कालीन परिस्थिती दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री ९.५१ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्या विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझे आदर्श हरपल्याची भावना राहुल गांधींनी व्यक्त केली आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, २७ डिसेंबर रोजी आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येणार आहे. आज ११ वाजता यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ होती
मनमोहन सिंग ३३ वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते, जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. २००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. ३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. चार महिन्यातच त्यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तसंच युपीएच्या काळात म्हणजेच २००४ ते २०१४ या कालावधीत ते सलग दोन टर्म म्हणजेच १० वर्षे देशाचे पंतप्रधान होते. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने भारतीय राजकारणाने एक सालस नेता गमावला आहे.






















Join Our Whatsapp Group