पिंपरी (Pclive7.com):- ताथवडे परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी पोलिस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी उपपोलीस आयुक्त प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

निवेदनात या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत जलदगतीने व निष्पक्षपणे पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आरोपीवर लागू असलेल्या सर्व संबंधित कायद्यांनुसार कठोरातील कठोर कारवाई करून पीडित मुलींना तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

यासोबतच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी नियमित पोलीस गस्त वाढविणे, जनजागृती मोहिमा राबविणे, प्रभावी सुरक्षा उपाययोजना करणे आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना नगरसेविका स्नेहा कलाटे म्हणाल्या, “महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना समाजात कोणतेही स्थान नाही. अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळाल्यासच कायद्याबाबत जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल. तसेच भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल. पीडित मुलींना तातडीने न्याय मिळणे ही समाजाची आणि प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे.”
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.




















Join Our Whatsapp Group