भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याकरिता चालू असलेल्या विविध प्रकल्पास भेट देत केली पाहणी
पिंपरी (Pclive7.com):- भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेंतर्गत करण्यात येत असलेली कामे विहित मुदतीत पूर्ण करा, असे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

पिंपरी चिंचवड शहराची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता भामा आसखेड धरणातून ६०.७९ द. ल. घ. मी. (१६७ द. ल. लि. प्रतिदिन) इतका पाणी कोटा आरक्षणास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. त्याअंतर्गत भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याकरिता चालू असलेल्या विविध प्रकल्पास आज आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भेट दिली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता दिपक पाटील, उपअभियंता दिनेश फाटक, कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील यांच्यासह संबंधित कामांचे ठेकेदार व सल्लागार उपस्थित होते.

आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेंतर्गत चालू असलेल्या भामा आसखेड धरण ते नवलाख उंबरे येथील बी.पी.टी.पर्यंतच्या १७०० मि.मी. व्यासाची उदंचन नलिका टाकणे, नवलाख उंबरे येथील बी.पी.टी. ते देहूपर्यंत १४०० मि.मी. व्यासाची गुरुत्व नलिका टाकणे तसेच भामा आसखेड धरण येथील जॅकवेल बांधणे या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष धरणाच्या पाण्याखालील १०० फूट खोल बोगद्याची (Intake Tunnel) पाहणी केली. तसेच या सर्व कामांचा आढावा घेऊन उर्वरित कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकारी, कामाचे सल्लागार व ठेकेदार यांना सूचना दिल्या.

पिंपरी चिंचवड शहराची भविष्यातील पाणी गरज लक्षात घेऊन भामा आसखेड पाणीपुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेतील सर्व कामांमध्ये गुणवत्ता आणि सुरक्षिततेची कोणतीही तडजोड न करता उर्वरित कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. शहराला नियोजित वेळेत या योजनेचा लाभ उपलब्ध होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.– डॉ. विजय सूर्यवंशी– आयुक्त,




















Join Our Whatsapp Group