पिंपरी (Pclive7.com):- निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वेचे काम सुरू असताना मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी भक्ती-शक्ती उड्डाणपूल ते निगडी बसस्टॉप दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्डे दिसत नसल्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी अनेक ठिकाणी लोखंडी पत्र्यांचे संरक्षक कुंपण उभारण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत असून, विशेषतः निगडी बसस्टॉप परिसरात हजारो प्रवाशांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर निगडी बसस्टॉप भक्ती-शक्ती उद्यानासमोर स्थलांतरित करण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. मात्र या मागणीकडे संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निगडी बसस्टॉप, आकुर्डी सिग्नल तसेच बजाज ऑटो कंपनीसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून रस्त्यांची चाळण झाली आहे. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुमारे दीड वर्षांपूर्वी अर्बन स्ट्रीट योजनेअंतर्गत निगडी ते आकुर्डी दरम्यानच्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीट कामासाठी सुमारे ४५ कोटी रुपये खर्च केले होते. एवढ्या मोठ्या खर्चानंतरही रस्त्याची झालेली दुरवस्था गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित ठेकेदारांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खर्च झालेली ४५ कोटी रुपयांची रक्कम संबंधितांकडून वसूल करावी, अशी मागणी केली आहे. निगडी ते आकुर्डी मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून वाहतुकीसाठी सुरक्षित व्यवस्था करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.




















Join Our Whatsapp Group