पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघातील कासारवाडीगाव रेल्वे मार्गामुळे पूर्व व पश्चिम अशा दोन भागांत विभागले गेले असून, रेल्वे क्रॉसिंग फाटक क्रमांक–६१ हा या दोन्ही भागांना जोडणारा एकमेव व अत्यंत महत्त्वाचा संपर्कमार्ग आहे. हे फाटक कायमस्वरूपी बंद झाल्यास दररोज हजारो नागरिकांना अनावश्यकपणे मोठा वळसा घालावा लागेल. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन प्रवासावर, सामाजिक व आर्थिक व्यवहारांवर तसेच सर्वसामान्य जनजीवनावर विपरीत परिणाम होईल. फाटक बंद करण्याच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करून फाटक पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे विभागाकडे केली आहे.

खासदार बारणे यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मावळ लोकसभा मतदारसंघातील कासारवाडी येथील रेल्वे क्रॉसिंग फाटक क्रमांक–६१ कायमस्वरूपी बंद करण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून सूचना जारी करण्यात आली असून, त्यासंदर्भात स्थानिक नागरिकांनाही माहिती देण्यात येत आहे. या प्रस्तावाबाबत स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांकडून गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कासारवाडीगाव रेल्वे मार्गामुळे पूर्व व पश्चिम अशा दोन भागांत विभागले गेले असून, रेल्वे फाटक क्रमांक–६१ हा या दोन्ही भागांना जोडणारा एकमेव व अत्यंत महत्त्वाचा संपर्कमार्ग आहे. कासारवाडी पश्चिम भागातील अनेक विद्यार्थी पूर्व भागातील श्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयात शिक्षण घेत आहेत. फाटक बंद झाल्यास विद्यार्थ्यांना लांब व गैरसोयीचा मार्ग वापरावा लागेल. त्यामुळे त्यांच्या वेळेची, सुरक्षिततेची तसेच शिक्षणाची हानी होण्याची शक्यता आहे.

याशिवाय कासारवाडी येथे दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणूक, एक गाव–एक शिवजयंती मिरवणूक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हिंदू नववर्ष (गुढी पाडवा), बसवराज महाराज मिरवणूक, ईद-ए-मिलाद तसेच श्री भैरवनाथ यात्रा व पालखी असे अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी व सुरळीत आयोजनासाठी या रेल्वे फाटकाचा वापर केला जातो. फाटक बंद झाल्यास या पारंपरिक कार्यक्रमांच्या आयोजनात व व्यवस्थापनात गंभीर अडथळे निर्माण होतील आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागेल.

याशिवाय अंत्यसंस्कार, अंत्ययात्रा तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलीस व इतर अत्यावश्यक सेवांकडूनही याच मार्गाचा वापर केला जातो. फाटक बंद झाल्यास आपत्कालीन सेवांच्या हालचालींमध्ये विलंब होण्याची शक्यता असून, त्यामुळे नागरिकांच्या जीवित व सुरक्षिततेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. रेल्वे विभागामार्फत कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग फाटक क्रमांक–६१ कायमस्वरूपी बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) प्राप्त करण्यात आले आहे. तथापि, सदर ना हरकत प्रमाणपत्र देताना स्थानिक नागरिकांची संमती, त्यांच्या गरजा तसेच जनभावनांचा पुरेसा विचार करण्यात आलेला नसल्याचे खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे.
पर्यायी मार्ग गैरसोयीचा..
अपर जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक फाटा जे.आर.डी. टाटा पूल मार्गे शंकर मठ मार्ग हा पर्यायी मार्ग सुचविला आहे. मात्र हा मार्ग स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत लांब व गैरसोयीचा आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला तसेच दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा मार्ग व्यवहार्य नाही. शिवाय या मार्गावर आधीच मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे जनहिताचा विचार करून कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग फाटक क्रमांक–६१ कायमस्वरूपी बंद करण्याच्या प्रस्तावाचा तातडीने पुनर्विचार करण्यात यावा. रेल्वे फाटक पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.
रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्गाची चाचपणी..
अपरिहार्य प्रशासकीय, तांत्रिक अथवा सुरक्षेच्या कारणास्तव सदर रेल्वे क्रॉसिंग फाटक क्रमांक–६१ कायमस्वरूपी बंद करणे अनिवार्य असल्यास, ते बंद करण्यापूर्वी स्थानिक नागरिकांच्या सुरक्षित, अखंड आणि सुलभ वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. त्यासाठी सदर ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल अथवा रेल्वे भुयारी मार्गाचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे. तो नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध झाल्यानंतरच रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.