पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील मारुती मंदिर ते निगडी सिग्नल दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागाकडे केली आहे.

मनसेच्या वतीने कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेट्रोच्या कामामुळे सदर रस्ता अरुंद झाला असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, दिवसभर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, स्पीड ब्रेकरही पुसट झाल्याने ते वाहनचालकांच्या लक्षात येत नाहीत. परिणामी वाहनांचा वेग वाढून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मनसेने महापालिकेला रस्त्यावरील खड्डे तातडीने भरून दुरुस्ती करण्याबरोबरच स्पीड ब्रेकरांना रंगरंगोटी करून दृश्यमान करण्याची तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनावर मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, उपविभाग अध्यक्ष स्वप्निल महांगरे, शाखाध्यक्ष सागर बहुले आणि रोहित काळभोर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.



















Join Our Whatsapp Group