पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी येथील मॅगझिन चौकात एका गणेश मंडळाने उभारलेली अनधिकृत कमान सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अचानक कोसळल्याची घटना घडली. कमान थेट मुख्य रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात आलेली कमान वादळी वाऱ्याचा तडाखा सहन करू शकली नाही. त्यामुळे ती अचानक कोसळून रस्त्यावर पडली. घटनेच्या वेळी कमानीखाली कोणतेही वाहन अथवा नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला.

कमान कोसळल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यावर अडथळा निर्माण झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तत्काळ कमान हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.

दरम्यान, या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना व अपुऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांसह उभारल्या जाणाऱ्या कमानींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा अनधिकृत संरचनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.



















Join Our Whatsapp Group