प्रभाग क्र.२५ मधील ३५० सोसायट्यांमध्ये वृक्ष लागवडीचा संकल्प
वाकड (Pclive7.com):- पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्त शहराच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक २५ मध्ये ‘हरित प्रभाग २५’ या विशेष उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ वाकड येथील अटलांटा सोसायटीत मंगळवारी (दि. २९) सकाळी ८.३० वाजता होणार असून, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडणार आहे. नगरसेविका श्रुती वाकडकर आणि पिंपरी चिंचवड भाजपा शहर उपाध्यक्ष रामभाऊ वाकडकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम संपन्न होत आहे.

वाकड प्रभाग २५ मधील सुमारे ३५० सोसायट्यांमध्ये वड, पिंपळ आणि लिंब यांसारख्या स्थानिक व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प या उपक्रमांतर्गत करण्यात आला आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या झाडांचे संगोपन, देखभाल आणि संवर्धन करण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रभागातील प्रत्येक सोसायटी, सार्वजनिक ठिकाणे आणि उपलब्ध मोकळ्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून परिसर हिरवागार, स्वच्छ आणि शुद्ध हवेसाठी अनुकूल बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या उपक्रमासाठी स्थानिक नागरिक, सोसायटी प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


















Join Our Whatsapp Group