पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दहशतवाद विरोधी शाखेने (एटीबी) आणि परकीय नागरिक नोंदणी विभागाने (एफआरओ) संयुक्त कारवाई करत व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या अफगाणिस्तानच्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. संबंधित विद्यार्थ्यावर डिपोर्टेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार एटीबीकडून आयुक्तालयाच्या हद्दीतील ओव्हरस्टे परदेशी नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत एफआरओकडून मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानचा नागरिक दानियार हुसेन (वय २६) हा पिंपरी-चिंचवड परिसरात अनधिकृतपणे राहत असल्याची माहिती मिळाली होती.
एटीबीचे पोलीस निरीक्षक विकास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित विद्यार्थी पुण्यातील बावधन परिसरातील पेबल्स अर्बानिया सोसायटी येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एटीबी, एफआरओ आणि बावधन पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारी (दि. २८ सप्टेंबर) छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दानियार हुसेन हा शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेजमध्ये एम.ए. (इकोनॉमिक्स) द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याचे समोर आले. मात्र तो जानेवारी २०२६ पासून महाविद्यालयात गैरहजर असल्याचेही आढळून आले.

पासपोर्ट आणि व्हिसा पडताळणीमध्ये त्याचा निवासी परवाना (Residential Permit) ३१ जानेवारी २०२६ रोजी संपुष्टात आला असून त्याला कोणतीही मुदतवाढ मिळालेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तो भारतात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही परदेशी नागरिक घर, फ्लॅट, बंगला किंवा हॉटेलमध्ये वास्तव्यास आल्यास त्याची माहिती सी-फॉर्मद्वारे २४ तासांच्या आत एफआरओकडे देणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त धीरज पाटील, एफआरओचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे आणि एटीबीचे पोलीस निरीक्षक विकास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


















Join Our Whatsapp Group