पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील दुसऱ्या तिमाहीसाठी मालमत्ताधारकांना मालमत्ता कराच्या ऑनलाइन भरण्यावर ४ टक्के सवलत देण्यात येत आहे. ही सवलत १ जुलै २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत मालमत्ता कराचा ऑनलाइन भरणा करणाऱ्या नागरिकांना लागू आहे.

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी उद्या बुधवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाइन मालमत्ता कर भरण्याची मुदत आहे. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही, त्यांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन कर भरून सामान्य करामध्ये मिळणाऱ्या ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
१ जुलै २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ५० हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी ४ टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. ऑनलाइन कर भरण्याच्या सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हावी, यासाठी महानगरपालिकेकडून ऑनलाइन पद्धतीने कर भरण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे.
दरम्यान, १ एप्रिल २०२६ ते २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ४ लाखांहून अधिक नागरिकांनी ६०१ कोटींचा मालमत्ता कर भरला आहे. चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर संकलनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, ऑनलाइन तसेच इतर उपलब्ध माध्यमांतून नागरिकांकडून कराचा भरणा करण्यात येत आहे.

मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असून, त्यातून शहरातील विविध नागरी सुविधा, पायाभूत सुविधा आणि विकासकामे राबविण्यात येतात. त्यामुळे नागरिकांनी आपला मालमत्ता कर वेळेत भरून महानगरपालिकेच्या विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, ३० सप्टेंबरनंतर थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जप्तीची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर थकीत असलेल्या औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र तसेच इतर थकीत मालमत्तांवर नियमानुसार जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदार मालमत्ताधारकांनी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आपला थकीत मालमत्ता कर विहित मुदतीत भरावा, असे आवाहन कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
मालमत्ता कर हा शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा आर्थिक स्रोत आहे. नागरिकांनी ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन मालमत्ता कराचा भरणा करून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा. नागरिकांनी वेळेत कर भरल्यास महानगरपालिकेला शहरातील पायाभूत सुविधा आणि विविध नागरी सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे शक्य होते. त्यामुळे नागरिकांनी कर भरण्याची आपली जबाबदारी पार पाडून शहराच्या विकासात सहभागी व्हावे.– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या नागरिकांनी ३० सप्टेंबरपूर्वी कराचा भरणा करून महापालिकेच्या वसुली कारवाई टाळावी. ३० सप्टेंबरनंतर मोठ्या प्रमाणात थकीत असलेल्या औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र तसेच इतर मालमत्तांवर नियमानुसार जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कारवाईची प्रतीक्षा न करता थकीत कराचा भरणा तातडीने करावा. तसेच, चालू कराचा ऑनलाइन भरणा करून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा. वेळेत कर भरणे ही केवळ आर्थिक जबाबदारी नसून शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग आहे.
– सचिन पवार , उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


















Join Our Whatsapp Group