पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी देवेंद्र तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी तायडे यांची नियुक्ती केली.

पक्षाच्या मुंबईतील मुख्यालयात प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांच्या हस्ते देवेंद्र तायडे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा पिंपरी-चिंचवडचे पक्ष निरीक्षक सुनील माने यांनी ही माहिती दिली.

तायडे यांच्याकडे संघटनात्मक अनुभव असून, चळवळीतून पुढे आलेल्या कार्यकर्त्याची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील पक्ष संघटनेला नवी दिशा मिळेल आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास सुनील माने यांनी व्यक्त केला.
आगामी काळात शहरातील विविध प्रश्नांवर कार्यकर्ते अधिक प्रभावीपणे काम करतील, तसेच पक्ष संघटना वाढीसाठी व्यापक पातळीवर प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश सरचिटणीस आमदार रोहित पवार तसेच वरिष्ठ नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा करून संघटनात्मक वाढीच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे माने यांनी स्पष्ट केले.



















Join Our Whatsapp Group