पिंपळे सौदागर (Pclive7.com):- भारतरत्न गानकोकिळा स्व. लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपळे सौदागर येथील अल्कोह सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक कलावंतांनी सदाबहार हिंदी गीतांचे सादरीकरण करत त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

सोमवार (दि.28) रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत सोसायटीच्या योगा गार्डनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात बाबासाहेब काळे, रमेश दुसाने, सुरेश तांबोळी, सुरेश बिरारी, रमेश चांडगे आणि खत्री यांनी सहभाग घेतला. यावेळी लतादिदींसह किशोर कुमार, मोहम्मद रफी, हेमंत कुमार, मुकेश, जगजीत सिंग आणि भूपेंद्र यांच्या गाजलेल्या गीतांचे सादरीकरण करण्यात आले.

“याद आ रही है”, “ये नयन डरे डरे”, “होठों से छू लो तुम”, “जाने कहाँ गये वो दिन”, “वो जब याद आये बहुत याद आये”, “पुकारता चला हूँ मैं”, “फूलों के रंग से दिल की कलम से”, “कहीं दूर जब दिन ढल जाए” आणि “ऐ मेरे वतन के लोगो” यांसारख्या अजरामर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या गीतांमधून लतादिदींच्या समृद्ध सांगीतिक वारशाला उजाळा देण्यात आला.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या संगीत क्षेत्रात लता मंगेशकर यांनी दिलेले अमूल्य आणि अतुलनीय योगदान सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना यावेळी ज्येष्ठ नागरिक कलावंतांनी व्यक्त केली. गीत-संगीताच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला मानवंदना देण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले. या सुरेल कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिकांना जुन्या आठवणींना उजाळा देत संगीताचा आनंद लुटण्याची संधी मिळाली.


















Join Our Whatsapp Group