पिंपरी (Pclive7.com):- नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या आणि परिसराचे विद्रूपीकरण करणाऱ्या अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कठोर कारवाई हाती घेतली आहे. हिंजवडी येथील लक्ष्मी चौक परिसरात उभारण्यात आलेले तब्बल आठ अनधिकृत महाकाय होर्डिंग्ज हटविण्यात आले. मात्र, या कारवाईदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली असून होर्डिंग हटवताना वापरण्यात आलेली क्रेन अचानक पलटी झाली. या अपघातात एक टेम्पो आणि हातगाडीचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

‘पीएमआरडीए’च्या पाहणीत हिंजवडीतील लक्ष्मी चौक परिसरातील गट क्रमांक २६२ आणि २६३ मध्ये विनापरवाना आठ महाकाय जाहिरात फलक उभारण्यात आल्याचे आढळून आले होते. प्रशासनाने कारवाईचा इशारा दिल्यानंतर संबंधित फलकधारकांनी स्वतःहून सहा होर्डिंग्ज हटविले. उर्वरित दोन फलकांवर मात्र ‘पीएमआरडीए’च्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने थेट कारवाई करत ते जमीनदोस्त केले.

गुरुवार (३० जुलै) आणि शुक्रवार (३१ जुलै) अशा सलग दोन दिवसांत ही मोहीम राबविण्यात आली. कारवाई दरम्यान एका महाकाय होर्डिंगचे लोखंडी स्ट्रक्चर हटविताना क्रेनचा तोल जाऊन ती पलटी झाली. यामध्ये जवळ उभ्या असलेल्या एका टेम्पो आणि हातगाडीचे नुकसान झाले. मात्र, घटनास्थळी उपस्थित कर्मचारी आणि नागरिक सुरक्षित राहिल्याने मोठा अनर्थ टळला.

ही धडक कारवाई अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे सहआयुक्त हिंमत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात तहसीलदार आशा होळकर, रवींद्र रांजणे, दक्षता विभागाचे पोलीस निरीक्षक पवन पाटील तसेच ‘पीएमआरडीए’चे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.




















Join Our Whatsapp Group