पिंपरी (Pclive7.com):- पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरण 99 टक्के भरले असून धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी नदीपात्रातील विसर्ग वाढविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.

पवना धरण प्रकल्पाकडून दुपारी 4:15 वाजता जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, सध्या पवना नदीपात्रात 7,880 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून तो वाढवून 9,200 क्युसेक करण्यात येणार आहे. तसेच धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू राहिल्यास हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून 15,000 क्युसेकपर्यंत नेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सततच्या पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे पवना नदीच्या सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी आणि लाभधारकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

नदीपात्रातील शेती अवजारे, कृषी पंप, जनावरे तसेच इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूर नियंत्रण कक्ष, पवना धरण प्रकल्प पवनानगर यांच्याकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार पुढील माहिती जाहीर केली जाणार आहे.



















Join Our Whatsapp Group