पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात १५ टक्के पाणी कपातीची घोषणा केलेली असताना, घरकुल स्पाईन रोड चौकातील मुख्य पाणीपुरवठा वाहिनीच्या व्हॉल्वमधून गेल्या पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. या गळतीमुळे आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांनी केला आहे.

सदर ठिकाणी पाणी सातत्याने वाहत असून परिसरात चिखल व पाण्याचे डबके निर्माण झाले आहेत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, घरकुल स्पाईन रोड हा वर्दळीचा मार्ग असून अनेक महापालिका कर्मचारी व अधिकारी दररोज याच रस्त्यावरून ये-जा करतात. तरीही पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या गळतीकडे कोणत्याही संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे दिसून येत आहे.

“एका बाजूला नागरिकांवर पाणी कपात लादली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. पाच दिवसांपासून सुरू असलेली ही गळती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिसत नाही का? की जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जात आहे?” असा संतप्त सवाल मारुती जाधव यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित पाणीपुरवठा विभागाने त्वरित व्हॉल्वची दुरुस्ती करून पाण्याची गळती थांबवावी, तसेच इतके दिवस दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मारुती जाधव यांनी केली आहे. “पाणी वाचवा, पाण्याचा अपव्यय थांबवा; नागरिकांवर कपात आणि प्रशासनाकडून पाण्याची नासाडी चालणार नाही!” अशी भूमिका जाधव यांनी मांडली आहे.



















Join Our Whatsapp Group