पिंपरी (Pclive7.com):- मराठी भाषेचे वैभव अधिक समृद्ध करण्यासाठी महापालिका सर्वांना सोबत घेऊन मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवित आहे. यावर्षीच्या अभिजात मराठी भाषा दिवस तसेच अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानेही महापालिकेच्या वतीने मराठी भाषेतील साहित्य आणि संस्कृतीशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये मराठी साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मराठी भाषा संवर्धनाच्या या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या निर्देशानुसार, ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस उप आयुक्त पंकज पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडीचे प्राचार्य शशिकांत पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, ग्रंथालय प्रमुख प्रतिभा मुनावत, ग्रंथपाल वर्षा जाधव, वैशाली थोरात यांच्यासह मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत संस्थांचे प्रतिनिधी, साहित्यिक, अभ्यासक व कलाकार उपस्थित होते. त्यामध्ये कल्पना क्षीरसागर, प्रकाश क्षीरसागर, विजय न्यायाधीश, सविता इंगळे, संदीप तापकीर, शोभा जोशी, प्रदीप गायकवाड, सुनिल भिसे, कवी डॉ. जयद्रथ आखाडे, किरण जोशी, प्रकाश निर्मळ, कैलास भैरट, शामला पंडित, सीमा गांधी, अशोक होनराव, प्रकाश ढवळे, आनंद यंक्रस, राजन लाखे, डॉ. संजय पवार, संभाजी बारणे, राजेंद्र कांकारिया, मनोज डाळीम्बकर, पंकज चव्हाण, सुहास जोशी, राजेंद्र बंग, राजेंद्र धारटे, विजय पानसरे, संदीप कर्नावट, विजय उलपे, अशोक सोनवणे, चंद्रकात धस, अरूण बोऱ्हाडे, विजयकुमार पिरंगुटे, संतोष रासने, ज्ञानेश्वर घाडगे आदी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले, अभिजात मराठी भाषा सप्ताह आणि अभिजात मराठी भाषा दिवसाच्या नियोजनासाठी प्राप्त झालेल्या योग्य सूचनांचा महापालिकेच्या वतीने निश्चितपणे अंतर्भाव करण्यात येईल. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन अधिक व्यापक व्हावे यासाठी महापालिका सातत्याने पुढाकार घेत राहील. मात्र, मराठी भाषा संवर्धनाची ही जबाबदारी केवळ महापालिकेपुरती मर्यादित नसून, त्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. शहरवासीयांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मराठी भाषेच्या संवर्धनाची ही लोकचळवळ निरंतर पुढे चालू ठेवावी.
यावेळी उपस्थितांनी अभिजात मराठी भाषा सप्ताह व अभिजात मराठी भाषा दिवसाच्या आयोजनाबाबत विविध सूचना मांडल्या. त्यामध्ये शहरात अनेक साहित्यिक वास्तव्यास असून त्यांची स्वलिखित पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. या स्थानिक साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या पुस्तकांचा महापालिकेच्या ग्रंथालयांमध्ये समावेश करण्यास तसेच विविध प्रसंगी महापालिकेच्या वतीने भेट स्वरूपात देण्यासाठी प्राधान्याने विचार करण्यात यावा, अशी सूचना उपस्थितांनी मांडली. स्थानिक कलाकारांनाही अशा उपक्रमांमधून प्रोत्साहन मिळत असल्याने, महापालिकेच्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांना प्राधान्याने सहभागी करून घ्यावे. तसेच, मराठी भाषा संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या विविध संस्था आणि व्यक्तींना महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धनाशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी करून घेऊन त्यांच्या अनुभव व योगदानाचा उपयोग करून घ्यावा, अशी सूचनाही यावेळी मांडण्यात आली.
अभिजात मराठी भाषा सप्ताहातील जे दर्जेदार कार्यक्रम आहेत तिथे जास्तीत जास्त लोक एकत्रित यावेत यासाठी मध्यवर्ती ठिकाणी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. शाळांमध्ये अभिवाचन, निबंधलेखन, कविता व कथालेखन, पत्रलेखन, म्हणी-वाक्प्रचार, उखाणे आणि कोडी यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी विनामूल्य सहकार्य करण्याची उपस्थितांनी तयारी दर्शवली. तसेच विद्यार्थ्यांना शाहिरी परंपरेसह विविध मराठी लोककलांचे प्रशिक्षण तसेच लेखक आपल्या भेटीला यांसारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचना यावेळी उपस्थितांनी मांडल्या.
शहरातील स्थानिक साहित्यिक, लेखक, कवी व कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या साहित्याची खरेदी करावी. तसेच स्थानिक साहित्यिक व कलाकारांना कार्यक्रमांमध्ये प्राधान्य द्यावे. याशिवाय, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत साहित्यिक, सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांकडून लेखी सूचना मागवून घ्याव्यात. याव्यतिरिक्त, तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा व शिबिरे, अभिजात मराठी भाषेतील प्राचीन व मौल्यवान ग्रंथांचा अभ्यास व परिचय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी ग्रंथ व साहित्यांचे प्रदर्शन, प्राचीन ग्रंथ संपदेचे समकालीन मराठीत अनुवादित पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री या उपक्रमांचे आयोजन करावे आणि नोकरदार वर्गालाही कार्यक्रमांचा लाभ घेता यावा, यासाठी काही कार्यक्रम सायंकाळच्या वेळेत आयोजित करण्याबाबत सूचना मांडण्यात आल्या.
यावेळी अभिजात मराठी भाषा सप्ताह व अभिजात मराठी भाषा दिवसाच्या आयोजनाबाबत नागरिक, साहित्यिक, लेखक, कवी, अभ्यासक, कलाकार तसेच विविध सामाजिक संस्थांनी आपल्या सूचना वेळेत लेखी स्वरूपात पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनाच्या तळमजल्यावरील माहिती व जनसंपर्क विभागात सादर कराव्यात किंवा [email protected] या अधिकृत ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले.



















Join Our Whatsapp Group