पिंपरी (Pclive7.com):- उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे श्रद्धा, नवकल्पना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम पाहायला मिळाला आहे. भोसरीतील नोबल कास्ट कंपनीमध्ये नितीन भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली अॅल्युमिनियम धातूपासून अत्यंत आकर्षक गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे.

आधुनिक व्हीएमसी (VMC) मशिनिंग सेंटर आणि सूक्ष्म-अचूक यंत्रप्रक्रियेच्या साहाय्याने तयार करण्यात आलेली ही गणेशमूर्ती कंपनीच्या उच्च तांत्रिक कौशल्याचे तसेच नावीन्यपूर्ण विचारांचे प्रतीक ठरत आहे. उत्पादन क्षेत्रातील अचूकता आणि गुणवत्ता जपत नोबल कास्टने तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड देत अभियांत्रिकी कौशल्याचे अनोखे दर्शन घडवले आहे.
अॅल्युमिनियमपासून तयार करण्यात आलेल्या या बाप्पाच्या मूर्तीने उद्योग क्षेत्रातही गणेशोत्सवाचे वेगळेपण अधोरेखित केले आहे. पारंपरिक भक्तीभावासोबत आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाचा समन्वय साधणारा हा उपक्रम अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.

यावेळी नितीन भागवत यांनी सांगितले की, गणरायाच्या कृपेने नोबल कास्ट परिवाराला समर्पित संघ, उत्कृष्ट गुणवत्ता, नवीन संधी आणि उज्ज्वल भविष्य लाभावे. तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि नवकल्पनांच्या बळावर सातत्याने प्रगती करण्याची प्रेरणा गणरायाकडून मिळत राहो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
उद्योग आणि श्रद्धेचा सुंदर मिलाफ घडवणारी ही अॅल्युमिनियमची गणेशमूर्ती सध्या भोसरी परिसरात विशेष चर्चेचा विषय बनली आहे.


















Join Our Whatsapp Group