पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मिठाईची दुकाने, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे तसेच गर्दीच्या ठिकाणांवरील आस्थापनांची कसून तपासणी करण्यात येत असून आतापर्यंत सुमारे १५० आस्थापनांची पाहणी करण्यात आली आहे.

तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आलेल्या काही दुकानदारांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. स्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता, परवाने व अन्न सुरक्षा मानकांचे पालन याबाबत प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
यंदा एफडीएने गणेश मंडळांकडून भाविकांना वितरित करण्यात येणाऱ्या महाप्रसादावरही विशेष नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाप्रसाद तयार करण्याची किंवा पुरवठ्याची ऑर्डर स्वीकारण्यापूर्वी परवानाधारक केटरर्सनी एफडीएचा अधिकृत पूर्वनियोजन नमुना भरून संबंधित झोनच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याशिवाय दूध, पनीर, खवा, तूप आदी दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेची तपासणीही सुरू असून भेसळ किंवा निकृष्ट दर्जाच्या पदार्थांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अन्न सुरक्षा नियमांचे व स्वच्छतेचे पालन न करणाऱ्या आस्थापनांविरोधातील कारवाई आगामी काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गणेशोत्सवादरम्यान लाखो भाविक विविध ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत असल्याने अन्न सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेते, केटरर्स आणि गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


















Join Our Whatsapp Group