पिंपरी (Pclive7.com):- डेटिंग ॲप वरून ओळख करून फोन करण्यासाठी बोलावून एका तरुणाचे अपहरण करत मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याची चैन लुटल्याची धक्कादायक घटना पिंपळे गुरव परिसरात घडली आहे. या प्रकरणी सौरभ कलकुटकी (रा. कोल्हापूर), पवन पाटील (रा. कोल्हापूर) यांच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लैशराम रोहित सिंह (वय २६, रा. सह्याद्री कॉलनी, साई वास्तू निवास पिंपळे गुरव) यांना ग्रॅन्डर डेटिंग ॲप वरून ओळख झालेला सौरभ कलकुटकी याने फोन करण्याच्या बहाण्याने पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालया जवळील पेरूच्या बागेजवळील पार्किंगमध्ये बोलावले. तेथे सौरभ कलकुटकी आणि त्याचा साथीदार पवन पाटील यांनी फिर्यादीला जबरदस्तीने कारमध्ये बसवले.

यानंतर आरोपींनी फिर्यादीला विविध ठिकाणी फिरवत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या मोबाईलमधील बँक अॅप्लिकेशनचा वापर करून एका व्यक्तीच्या खात्यात ५० हजार रुपये जबरदस्तीने हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. याशिवाय फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून घेतली. अशा प्रकारे आरोपींनी सुमारे २ लाख रुपयांचा ऐवज लुटल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पवन पाटील याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.




















Join Our Whatsapp Group