पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर पिंपरी चिंचवड शहरातील युवानेते विशाल शंकर वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या.

पक्षासाठी केलेले योगदान, संघटनात्मक बांधणीतील सक्रिय सहभाग आणि युवकांमध्ये पक्षाची विचारधारा प्रभावीपणे पोहोचविण्याच्या कार्याची दखल घेत वाकडकर यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी काळात राज्यभर युवक संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ते कार्यरत राहतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

नियुक्तीनंतर विशाल वाकडकर यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. पक्षाने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरत युवकांना संघटित करून पक्षवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विशाल वाकडकर यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून वाकडकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




















Join Our Whatsapp Group