पिंपरी (Pclive7.com):- चारचाकी खासगी वाहनांसाठी लवकरच सुरू होणाऱ्या ‘एमसी’ या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.३० दरम्यान कार्यालयात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करणे आवश्यक राहील. सदर डीडी ‘डी.वाय. आर.टी.ओ. पिंपरी चिंचवड’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत/शेड्युल्ड बँकेचा पुणे येथील असावा. एकाच क्रमांकाकरिता जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात येईल.
या यादीतील अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच डीडी ३१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात घालून कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोदणी प्राधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तिसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष (डीडी) सादर केला असेल त्यास पसंती क्रमांक वितरीत केला जाईल. लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने क्रमांक आरक्षित करण्यासाठी नागरिकांना उपलब्ध करण्यात येतील.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून १८० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेले शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये यांनी केले आहे.