पिंपरी (Pclive7.com):- महिलांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित लॉलीपॉप एंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट या संस्थेच्या वतीने “महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा २०२४” मेगा शोचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथे झालेल्या या सौंदर्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून २५ गृहिणींसह विविध क्षेत्रातील महिलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पुण्यातील श्वेता वाळुंज यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना प्रथम क्रमांकाचा मुकुट, पंधरा हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र मंगेश गायकवाड आणि शुभांगी गायकवाड यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
द्वितीय पारितोषिक जळगावच्या दर्शना तायडे यांनी पटकावला.त्यांना मुकुट, बारा हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांकाच्या मानकरी सातारा जिल्ह्यातील रेणू खुडे आणि मुंबईतील सायली शिंदे यांना विभागून देण्यात आला. त्यांचा मुकुट, दहा हजार, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. इतर स्पर्धकांना सोन्याची नथ, पैठणी आणि स्मृतिचिन्ह देऊन भेट देण्यात आले.
इतर उत्कृष्ट पुरस्कारासाठी साक्षी शहा, निकिता ओहाळ, भक्ती सुतार यांची निवड करण्यात आली. लहान मुलांच्या गटात प्रथम पारितोषिक सारा गोडेकर, द्वितीय तेजल मेहेर आणि तृतीय आर्या वायले यांना देण्यात आले. स्वागत कॅलिस्टा पिजंटचे संचालक संजीव जोग, सूत्र संचालन आर. जे. बंड्या यांनी आणि शिल्पा मगरे गाडेकर यांनी आभार मानले.