पिंपरी (Pclive7.com):- लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला असा गुन्हा दाखल असलेल्या भारतीय लष्करातील कॅप्टन दर्जाच्या अधिकाऱ्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लग्नाच्या आमिषाने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार म्हणता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत पुणे सत्र न्यायालयाने कॅप्टनची निर्दोष मुक्तता केली आहे.
संबंधित तरुणी ही पिंपरी-चिंचवडजवळील एका कंपनीत कार्यरत होती. ३१ वर्षांच्या तरुणीने २७ वर्षीय कॅप्टन विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी तरुणीचे वडील भारतीय नौदलात कार्यरत होते. त्यांचा मृत्यू झाला होता आणि तिच्या वडिलांचे कार्ड हरवले होते आणि ते मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यात आला होता. त्या प्रक्रियेच्या अनुषंगाने फिर्यादी तरुणी तिच्या मैत्रिणीमार्फत कॅप्टनच्या संपर्कात आली. आरोपी कॅप्टनने तिला मदत केली आणि त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमप्रकरणात झाले. त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप फिर्यादी तरुणीकडून करण्यात आला होता. आरोपीने तिला लग्न करण्याचे फक्त आश्वासन दिले होते. लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे तिने त्याला लग्न करण्याची विनंती केली अन्यथा ती त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करेल, असे म्हणत असे. फिर्यादी तरुणीने आरोपीला फोन करून तिच्याशी लग्न करण्याची विनंती केली, परंतु त्याने नकार दिला आणि अशाप्रकारे तिने तक्रार दाखल केली आणि सध्याचा एफआयआर आरोपीविरुद्ध नोंदवला गेला.
आरोपीचे वकील अरविंद धनराज आसवानी यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा दाखला देत आरोपींवर लावण्यात आलेले आरोप निराधार आहेत आणि आरोपी आणि फिर्यादीत शारीरिक संबंध होते असे गृहीत धरले तरी ते बलात्कार ठरत नाहीत. आरोपी हा फिर्यादी तरुणीशी लग्न करण्यास तयार होता, परंतु फिर्यादी तरुणीने वचनाचा भंग केला आहे, आणि तिनेच लग्नास नकार दिला आहे, असा युक्तिवाद केला.
सत्र न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी आरोपीचे वकील आणि सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयानुसार बलात्काराचा गुन्हा उघडकीस आला नाही, असे नमूद केले. आरोपीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली होऊनही फिर्यादी तरुणी सतत त्याच्या संपर्कात होती. आरोपी यांनी फिर्यादी तरुणीशी लग्न करण्यास कधीही नकार दिला नाही आणि फिर्यादी तरुणीने स्वतःच त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आणि त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला.
न्यायालयाने पुढे असे निरीक्षण नोंदवले की, वरील निकालात नमूद केलेल्या तत्त्वांच्या संदर्भात असा निष्कर्ष काढता येणार नाही की, फिर्यादी तरुणीने प्रेमसंबंधातून आरोपीशी तथाकथित शारीरिक संबंध ठेवले आहेत. त्यामुळे रेकॉर्डवर ठेवलेल्या मुंबई उच्च न्यायालय आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांवर विसंबून आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरावे नाहीत, त्यामुळे आरोपीविरुद्ध खटला चालवणे व्यर्थ ठरेल, त्यामुळे आरोपीला या प्रकरणातून वगळले जाईल, असा निर्वाळा देत या खटल्यातून आरोपीला दोषमुक्त केले.