मुंबई (Pclive7.com):- बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त मुंबईत शिवसेना (ठाकरे) पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगमी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. याबरोबरच ठाकरेंनी भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना इशारा देखील दिला आहे.
आगमी महापालिका निवडणुकां स्वबळावर लढवण्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “येत्या काही काळात महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतो आहे. मुंबई, संभाजीनगर नाशिक सगळ्यांशी बोलून झालं. सगळ्यांचं म्हणणं आहे की एकटं लढा”.
पुढे बोलताना ठाकरे समोर उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की,”ताकद आहे? अमित शहांना जागा दाखवणार आहात? ठीक आहे… अजून निवडणूक जाहीर झाली नाही. तुमची जिद्द, तयारी बघू द्या… ज्या भ्रमात आपण राहिलो, त्या भ्रमातून पहिलं बाहेर या….ज्या क्षणी माझी खात्री पटेल की आपली तयारी झाली आहे, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही”.
“पण यावेळी मला सूड उगवून पाहिजे.. सूड, सूड आणि सूड होय सूड… जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो. जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरदहस्त मला महाराष्ट्रात दिसता कामा नये”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटं लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहाणार नाही”, असेही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना सांगितले.





















Join Our Whatsapp Group