पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ व सुशोभित ठेवण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची असून स्वच्छतेचे काम करताना सफाई मित्रांनी उपयुक्त साधने व उपकरणे वापरणे आवश्यक आहे. महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे क्षमता बांधणी प्रशिक्षण कर्मचाऱ्यांनी आत्मसात करून त्याचा दैनंदिन कामामध्ये अवलंब करणे देखील गरजेचे आहे, असे मत उप आयुक्त सचिन पवार यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ होणार आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य व सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यासाठी आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकारामनगर येथे स्वच्छ्ता क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड, सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे, राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक भूषण शिंदे, दत्तात्रय गणगे, आरोग्य निरीक्षक रुपाली साळवे, संतोषी कदम, वैभव केचन गौडार, मुकेश जगताप, विकास शिंदे, लक्ष्मण साळवे, स्नेहा चांदणे यांच्यासह आरोग्य सहाय्यक, आरोग्य मुकादम महापालिकेच्या अ, ब क्षेत्रीय कार्यालयांमधील सफाई कर्मचारी उपस्थित होते.
उप आयुक्त सचिन पवार म्हणाले, आरोग्य निरीक्षक व सफाई मित्र यांनी स्वच्छता करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा. आरोग्याच्या चांगल्या सवयींचा अंगीकार करावा, आरोग्याची वेळोवेळी तपासणी करावी असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२४ ची माहिती दिली आणि कामकाज चांगल्या प्रकारे व वेळेत कसे पूर्ण करावे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
‘कॅम फाऊंडेशन’ यांच्याकडून क्षेत्रीय कार्यालय अ, ब मधील मनपा, ठेकेदार व कंत्राटी सफाई कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले तसेच सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई कीटचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी स्वच्छ भारत अभियान “क्षमता बांधणी, कौशल्य विकास व ज्ञान व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी कार्यक्रमांचे प्रस्ताविक करताना कर्मचाऱ्यांना कचरा वर्गीकरण करताना सुरक्षा साधनाचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अजून एक वैशिष्टय म्हणचे संपूर्ण कार्यक्रम झिरो वेस्ट पद्धतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास गायकांबळे यांनी केले.
या प्रशिक्षणाच्या सत्रात कॅम फाउंडेशनच्या राहुल सोनावणे यांनी घनकचरा व्यवस्थापन कायदा २०१६ विषयी मार्गदर्शन केले. तसेच घन कचरा व्यवस्थापन कसे करावे या विषयी माहिती दिली. या सत्रात अ, ब क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचारी व घरोघरचा कचरा संकलन करणा-या वाहनांवरील कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले.