चिखली (Pclive7.com):- राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना विकासकामांच्या मुद्यावरून जाहीर कार्यक्रमात टोला लगावला आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे विधान महेश लांडगे यांनी केल्यानंतर अजित पवारांनी तोच धागा धरून “महेश लांडगे यांना माझं नाव घ्यायला का वाईट वाटलं हे मला माहित नाही. परंतु, ज्यानं चांगलं काम केलंय, त्याला चांगलं म्हणाला शिका” असं म्हणत अजित पवारांनी आमदार महेश लांडगे यांना टोला लगावला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची इमारत तसेच महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमीपूजन व लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (दि. ६) जाधववाडी, चिखली येथे संपन्न झाला. याप्रसंगी अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले, आता महेश लांडगे यांनी बोलताना सांगितले, त्यांना काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला माहित नाही. परंतु आख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे. ९२ मध्ये मी तुमचा खासदार झालो. ९२ ते २०१७ या कालावधीत पिंपरी चिंचवड सुधरवलं. प्रत्येक गोष्ट मी लक्ष देऊन करत असतो. अधिकाऱ्यांना विचारा मी त्यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करत मार्ग काढत असतो. शेवटी आपण युतीमध्ये आहोत. ज्यांनी चांगलं काम केलं, त्याला चांगलं म्हणायला शिका.. एवढा कंजूसपणा दाखवू नका. मी तर दिलदार आहे, जे कोणी चांगलं काम करतो त्याला मी क्रेडिट देत असतो असं सांगत अजित पवारांनी महेश लांडगे यांना टोला लगावला.





















Join Our Whatsapp Group