पिंपरी (Pclive7.com):- मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करण्यात येणार आहे. पोलिस, सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून महिलेला अटक करण्याची भीती घालून तिची १३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ७ ते ११ जानेवारी या कालावधीत दिघी येथे घडली. याप्रकरणी ५४ वर्षीय महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला आरोपींनी फोन केला. फिर्यादी यांच्या नावाने ग्लोबल ट्रेडिंग कंपनी सुरू आहे. त्या कंपनीचा ८ लाख ६२ हजार ७०३ रुपये कर पेंडिंग आहे. तुमचा गुन्ह्यात सहभाग आहे, असे सांगून फोन कट करण्यात आला. त्यानंतर अजित कुमार नाव सांगणाऱ्या व्यक्तीने फोन करून तो पोलिस असल्याची बतावणी केली. फिर्यादी यांच्या नावाने दिल्ली येथील एका बँकेत खाते सुरू करून त्यावरून मनी लाँडरिंग केली जात आहे. तुम्हाला अटक केली जाणार आहे, असे सांगून तुम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला, असे सांगितले.

त्यानंतर सीबीआय अधिकारी पायल ठाकूर असे नाव सांगणाऱ्या महिलेने फोन करून फिर्यादी महिलेला फंड चेकिंगच्या बहाण्याने एका बँक खात्यावर १३ लाख ८० हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले. त्यानंतरही पायल ठाकूर यांनी वेळोवेळी फोन करून अटक करण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्या भावाला घडलेला प्रकार सांगितला असता ही फसवणूक असल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास दिघी पोलिस करत आहेत.