औंध ते किवळे प्रवास होणार सिग्नलमुक्त – स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे
पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलख येथील रक्षक चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम आता पूर्णत्वाच्या टप्प्यावर आले असून, या पुलामुळे औंध ते सांगवी फाटा आणि रावेतपासून पुढे किवळेपर्यंतचा प्रवास लवकरच सिग्नलमुक्त आणि वाहतूककोंडीमुक्त होणार आहे. चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची नुकतीच पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या संदर्भात प्रकल्पाची सविस्तर माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे गुरव येथील जनसंपर्क कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही पार पडली.

या प्रकल्पाच्या पाहणीवेळी नगरसेविका आरती चोंधे, नगरसेविका स्नेहा कलाटे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सामाजिक कार्यकर्ते संकेत चोंधे, प्रसाद कस्पटे, सनी बारणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रक्षक चौक हा शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत कळीचा टप्पा मानला जातो. आमदार शंकर जगताप यांच्या सूचनेनुसार, या ठिकाणी पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी आणि पुढील नियोजनासाठी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यामध्ये पुलाच्या कामासह संलग्न असलेल्या बीआरटी बस वाहतुकीचे नियोजन कसे असेल, यावर विशेष भर देण्यात आला. बस प्रवासी आणि त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश यावेळी प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच पुलाचे रेलिंग आणि संपूर्ण कामाचे तातडीने ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याच्या सूचनाही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या उड्डाणपुलामुळे नागरिकांच्या वेळेची आणि इंधनाची मोठी बचत होणार असून, सांगवी-किवळे या संपूर्ण बीआरटी मार्गावरील वाहतूक अधिक वेगवान होणार आहे.

रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. या पुलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. कामात प्रवाशांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचा आढावा घेतला असून, हा पूल लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी सेफ्टी ऑडिटबाबत कडक सूचना दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी आणि सुलभ वाहतुकीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.– अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका.




















Join Our Whatsapp Group