पिंपरी (Pclive7.com):- कबड्डी हा आपल्या मातीतला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडलेला खेळ आहे. युवा खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातील प्रतिभेला संधी देणे, हा महापौर चषक स्पर्धेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. पिंपरी चिंचवड शहर क्रीडा क्षेत्रातही अग्रस्थानी राहावे, यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे,’ असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी येथील गावजत्रा मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ‘महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६’ चे उदघाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार महेश लांडगे, शंकर जगताप यांच्यासह स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, पीएमपीएल अध्यक्ष डाॅ.महेश आव्हाड, क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, नगरसदस्य योगेश लांडगे, कुंदन गायकवाड, उपायुक्त पंकज पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपखजिनदार प्रकाश बालवडकर, सहसचिव राजाभाऊ ढमढेरे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते विराज लांडगे, राष्ट्रीय खेळाडू मच्छिंद्र लांडगे, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा कविता आल्हाट, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी सचिव राजाभाऊ आंदेकर तसेच सहसचिव संदीप पायगुडे,सामाजिक कार्यकर्ते राहूल लांडगे,स्वप्नील लांडगे,शिवराज काटे यांच्यासह खेळाडू आणि नागरिक उपस्थित होते.
महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ही १० मेपर्यंत चालणार असून, या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित कबड्डी संघांच्या एकूण ८१२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये पुरुष गटातील ३६ आणि महिला गटातील २४ संघ आहेत. स्पर्धेचे सामने सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पडावेत, यासाठी तब्बल ५५ सामनाधिकारी कार्यरत आहेत.

महापौर रवि लांडगे म्हणाले,’ राज्यस्तरीय स्तरावर होत असलेल्या या स्पर्धेमुळे पिंपरी चिंचवड शहरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून, युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. कबड्डीसारख्या मातीतल्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिका सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, ‘पिंपरी चिंचवड शहरातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी अशा राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन अत्यंत आवश्यक आहे. कबड्डीसारख्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळते.’
आमदार शंकर जगताप म्हणाले की, ‘युवा पिढीने खेळांकडे करिअरच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड शहरात विविध उपक्रम राबवत खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.’
स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले की, ‘महापौर चषक स्पर्धेमुळे राज्यभरातील खेळाडूंना एक दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. शहरात अशा स्पर्धांमुळे क्रीडाप्रेमी नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे.’
सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले की, ‘कबड्डी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडलेला खेळ असून त्याच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिका सातत्याने कार्यरत आहे.’
क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे म्हणाले की, ‘महापौर चषक स्पर्धेमध्ये राज्यभरातील संघांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याबद्दल समाधान वाटते. आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून शहराची क्रीडा ओळख अधिक मजबूत करण्यात येईल.’
१७ लाख ५० हजार रुपयांची पारितोषिके
या स्पर्धेत विजयी होणाऱ्या संघांना रोख बक्षिसे आणि आकर्षक सन्मानचिन्हे प्रदान करण्यात येणार आहेत. पुरुष व महिला गटातील प्रथम क्रमांकाच्या संघाला प्रत्येकी २ लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १ लाख ५० हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी १ लाख रुपये तसेच चतुर्थ क्रमांकासाठी १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच उपउपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पुरुष व महिला संघास प्रत्येकी २५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय उत्कृष्ट खेळाडूंनाही विशेष वैयक्तिक पुरस्कार देण्यात येणार असून “दिवसाचा मानकरी”, “उत्कृष्ट चढाई”, “उत्कृष्ट पकड” आणि “अष्टपैलू खेळाडू” या विभागांमध्ये रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील एकूण बक्षीस रक्कम १७ लाख ५० हजार रुपये इतकी असून, त्यामुळे राज्यभरातील कबड्डीपटूंमध्ये या स्पर्धेबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.




















Join Our Whatsapp Group