श्री विठ्ठल परिवाराच्या प्रशिक्षण शिबिरात ‘बाल यशवंतराव’ समर्थ जाधवची उपस्थिती; बाल वारकऱ्यांमध्ये उत्साह
मावळ (Pclive7.com):- श्री विठ्ठल परिवार मावळ (संस्थापक आमदार सुनिल आण्णा शेळके) व सकल दिंडी नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “बाल वारकरी प्रशिक्षण शिबिराला” यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, तसेच मोबाईलच्या आहारी जाण्यापासून मुले दूर राहावीत, या उद्देशाने हे शिबिर भरविण्यात येत आहे.

जांभुळ येथील जिल्हा परिषद शाळेत सुरू असलेल्या या शिबिरात पहाटेपासूनच विविध उपक्रम राबवले जात आहेत. योगा, गीता पाठ, हरिपाठ, मृदूंग व हार्मोनियम प्रशिक्षण यासह वारकरी संप्रदायाची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली जात आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायावर सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत निरूपण घेतले जाते. विविध विषयांवर कीर्तनाचेही प्रशिक्षण दिले जात असल्याने बाल वारकरी उत्साहाने सहभागी होत आहेत. शिबिरासाठी विविध मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार व वारकरी संप्रदायातील अभ्यासक मार्गदर्शन करत असून विद्यार्थ्यांसाठी निवासी व्यवस्था, सात्विक आहार आणि धार्मिक वातावरणाची विशेष सोय करण्यात आली आहे.

दरम्यान, या शिबिराचे आणखी एक आकर्षण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील बालकलाकार समर्थ जाधव याची उपस्थिती. वडगाव मावळ येथील समर्थ जाधव याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “राजे शिवछत्रपती” मालिकेत त्याने बाल यशवंतराव यांची भूमिका साकारली आहे. तसेच “जुने फर्निचर”, “फिरस्ता”, “तुरियम” यांसारख्या चित्रपटांतही त्याने काम केले आहे.
समर्थ जाधव शिबिरात सहभागी झाल्याने इतर बाल वारकरीही आनंदित झाले असून त्याच्यासोबत संवाद साधण्यासाठी मुलांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. संस्कार, अध्यात्म आणि परंपरेची जोड देणारे हे शिबिर मावळ तालुक्यात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.




















Join Our Whatsapp Group