पिंपरी (Pclive7.com):- भारतीय संस्कृतीत गोमातेला विशेष स्थान असून तिची सेवा हीच खरी सेवा मानली जाते. याच भावनेतून भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दिनेश यादव यांनी त्यांच्या लाडक्या “सिंधु” गाईचा वाढदिवस अत्यंत भावनिक आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला. या अनोख्या उपक्रमाची सध्या परिसरात मोठी चर्चा होत असून नागरिकांकडूनही त्याचे कौतुक केले जात आहे.

विशेष म्हणजे, ज्या दिवशी “सिंधुर मोहीम” आयोजित करण्यात आली होती त्या दिवसाच्या स्मरणार्थ या गाईला प्रेमाने “सिंधु” असे नाव देण्यात आले. त्या दिवसाशी जोडलेली भावनिक आठवण यादव परिवाराने आजही जपून ठेवली आहे. काळाच्या ओघात सिंधु ही केवळ गाई न राहता यादव परिवारातील एक जिव्हाळ्याची सदस्य बनली आहे. वाढदिवसानिमित्त सिंधुचे विधिवत पूजन करण्यात आले. तिला पुष्पहार घालून औक्षण करण्यात आले तसेच गोड खाऊ भरवून तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी सिंधुला प्रेमाने कुरवाळत तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि भावनिक झाले होते.

यावेळी बोलताना दिनेश यादव म्हणाले, “गोमाता ही भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. तिची सेवा आणि जपणूक करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सिंधु आमच्या परिवारासाठी केवळ प्राणी नसून ती आमच्या घरातील आनंद, सकारात्मकता आणि प्रेमाचे केंद्र आहे.”
गोसेवा, संस्कृती संवर्धन आणि प्राण्यांप्रती असलेली माया यांचा संदेश देणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. परिसरातील नागरिकांनीही यादव परिवाराच्या या उपक्रमाचे स्वागत करत सिंधुला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “गोसेवा हीच खरी सेवा” हा संदेश देत साजरा करण्यात आलेला हा अनोखा वाढदिवस सध्या पिंपरी-चिंचवड शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.




















Join Our Whatsapp Group