पिंपरी (Pclive7.com):- वाकड–ताथवडे परिसरातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आता हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावर त्यांनी थेट सवाल उपस्थित करत जलकुंभ प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

ताथवडे परिसरात उभारण्यात येत असलेल्या २५ लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभांचे काम अंतिम टप्प्यात असले तरी प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वाव्हळकर यांनी प्रशासनाला धारेवर धरत जलकुंभ तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले.
तसेच वितरण नलिका, वीज जोडणी व पंपिंग यंत्रणा यांसारख्या तांत्रिक बाबी लवकर पूर्ण करून निश्चित वेळेत पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. “नागरिकांना पाणीपट्टी भरूनही टँकरवर अवलंबून राहावे लागणे ही गंभीर बाब आहे. टँकर माफियाला आळा घालून नियमित पाणीपुरवठा देणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

नगरसेवकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, येत्या काही दिवसांत जलकुंभ प्रकल्प पूर्ण होऊन वाकड–ताथवडे परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




















Join Our Whatsapp Group