पिंपरी (Pclive7.com):- दापोडी परिसरातील एका अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण 26 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दापोडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई आकाश श्रावण सोनवणे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ही कारवाई 19 जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जयभीमनगर, दापोडी येथील एस.आर.ए. योजनेच्या नव्या इमारतीमधील मोकळ्या जागेत करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा रामदुलार यादव (वय 30), राकेश विजय जाधव (वय 33), दीपक लक्ष्मण साळुंखे (वय 31) आणि विशाल दिलीप ओव्हाळ (वय 27) हे विनापरवाना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ‘तीन पत्ती’ हा जुगार खेळताना आढळून आले.

धाडीदरम्यान आरोपींकडून रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दापोडी पोलीस करीत आहेत. अवैध जुगाराविरोधातील मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून परिसरातील अशा बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांची नजर कायम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.




















Join Our Whatsapp Group