पिंपरी (Pclive7.com):- घरभाड्याच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका दाम्पत्याला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना (दि.१८) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास काटे चाळ, श्रीकृष्ण कॉलनी, थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी विकास मधुकर पंडित (वय २६, रा. बबन काटे यांच्या रूममध्ये सुंदर कॉलनी, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार घरमालक बबन काटे, त्यांचा मुलगा (रा. पिंपळे सौदागर) आणि दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि घरमालक यांच्यात घरभाड्याच्या पैशांवरून वाद सुरू होता. यावेळी आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीची पत्नी मध्यस्थी करण्यासाठी आली असता तिलाही मारहाण करण्यात आली.

तसेच आरोपीच्या मुलाने हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या हातावर वार करून जखमी केले. अन्य एका आरोपीने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या हाताजवळ मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला दुखापत झाली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नलावडे करीत आहेत.




















Join Our Whatsapp Group