पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडून चुकीची कामे केली जात आहेत. त्यामुळे महापालिकेच्या विविध प्रकल्पांवर व विकासकामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची बदली करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड भाजपचे अमोल थोरात यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (दि.६) पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी अमोल थोरात यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले. या निवेदनात नमूद केले आहे की, महापालिका निवडणूक न झाल्याने २०२२ पासून महापालिकेत ‘प्रशासक’राज आले. त्याचवेळी पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून शेखर सिंह यांची नियुक्ती झाली. प्रशासक म्हणून त्यांनी पारदर्शी आणि उत्तम कामगिरी बजावणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी शहरवासीयांना तसेच माजी नगरसेवक व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता एककल्ली कारभार चालवला आहे. त्यांच्यासह अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील देखील चुकीची कामे करत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनात अनागोंदी असून सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांना हटवून सक्षम अधिकाऱ्यांची महापालिका आयुक्तपदी तसेच अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात यावी.

शेखर सिंह यांनी चुकीच्या पद्धतीने कामकाज सुरू ठेवले आहे. टीडीआर वाटप करण्यात मोठा घोळ झाला आहे. टीडीआर घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांनी सारवासारव केली. त्यानंतर एका बड्या बिल्डरला रस्ते खोदाई प्रकरणात पाठीशी घालून महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणातही महापालिका प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. भाजपने भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कामकाजाचे अभिवचन देत महापालिकेत सत्ता मिळवली होती. त्यामुळे भाजप पक्षाकडून शहरवासीयांना अपेक्षा आहेत. शहरवासीयांमध्ये भाजपची सकारात्मक प्रतिमा आहे. या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. मात्र, महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत असलेले शेखर सिंह यांची कार्यशैली संशयास्पद आहे. कोणत्याही प्रकारची दूरदृष्टी न ठेवता तसेच शहराच्या हितासाठी काम न करता प्रशासनावर वचक न ठेवता अनागोंदी व भोंगळ कारभार होण्यास शेखर सिंह जबाबदार आहेत. यातून पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिकांच्या पैशांचा गैरवापर होऊन लुट होते आहे. महापालिकेचा प्रशासकीय कारभार असाच सुरू आहे.
महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी देखील शेखर सिंह यांच्याप्रमाणे चुकीची कामे केली आहेत. त्यांनी देखील महापालिकेच्या पैशांची लुट केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रकल्पांवर त्याचा परिणाम झाला आहे. यातून भाजप आणि राज्य सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त पदावरून शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त पदावरून प्रदीप जांभळे पाटील यांना हटवून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना गडचिरोली येथे बदली करावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी निवेदनाव्दारे केली आहे.