पिंपरी (Pclive7.com):- आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील अनधिकृत शाळांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. शहरातील १० इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनधिकृत घोषित करण्यात आले असून, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांनी पालकांना केले आहे.

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, संबंधित शाळांनी शासनाने ठरवून दिलेले आवश्यक निकष पूर्ण केलेले नाहीत. तसेच, आवश्यक मान्यता व तांत्रिक कागदपत्रांची पूर्तता करण्यातही त्या शाळा अपयशी ठरल्या आहेत. यापूर्वी अनेकदा नोटिसा देऊनही त्रुटी दूर करण्यात आल्या नसल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, १ जूनपासून या शाळांवर प्रत्यक्ष कारवाई सुरू केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्यासाठी शाळांच्या प्रवेशद्वारावर “येथे प्रवेश घेऊ नये” असे फलक लावण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांना भविष्यात गंभीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बोर्डाच्या परीक्षा देताना, शाळा सोडल्याचा दाखला (LC) मिळवताना तसेच उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना कायदेशीर अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संबंधित शाळांकडून प्रशासनाकडे मुदतवाढीची मागणी करण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, शाळा अधिकृत करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट असून अटी जाचक आहेत. तसेच, विद्यार्थ्यांना युआयडी व अपार आयडी देण्यात येत असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळांची यादी पुढीलप्रमाणे..
ब्लोमिंग बर्ड्स, ताथवडे
लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल, चिंचवडेनगर
माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी
डी. एम. के. इंटरनॅशनल स्कूल, कासारवाडी
माने इंग्लिश मिडीयम स्कूल, काळेवाडी
नर्चर इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी, चऱ्होली
माईंडवर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी, चऱ्होली
हेम्स इंटरनॅशनल स्कूल, वाकड
कॅटलिस्ट इंटरनॅशनल स्कूल, चऱ्होली फाटा
गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल, मोशी
“अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन पालकांना करण्यात येत आहे. या शाळांकडे आवश्यक मान्यता नसल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी योग्य शाळेची खातरजमा करूनच प्रवेश घ्यावा.”– संगीता बांगर (शिक्षणाधिकारी)




















Join Our Whatsapp Group