चिंचवड (Pclive7.com):- राज्यामध्ये सत्तापालट होत असताना पदांमध्ये देखील बदल होत असतात. मी यापूर्वीही राज्यातील सर्वसामान्य माणसांना बांधील होतो. यापुढील काळातही राहणार आहे. राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींचा भाऊ हीच माझी खरी ओळख आहे. त्यांच्यासाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त संघर्षयोद्धा या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि. १६) करण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम पार पडला. त्या प्रसंगी शिंदे बोलत होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे (अयोध्या) कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी देव महाराज, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री तथा आमदार विजय शिवतारे, आमदार सुनिल शेळके, महेंद्र थोरवे, राहुल कुल, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे आणि गोविंदगिरी देव महाराज यांच्या हस्ते श्रीरंग बारणे यांना मानपत्र प्रदान केले तसेच, त्यांचा सन्मान केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, अयोध्येतील श्रीराम मंदिर हे संघर्ष मंदिर ठरले. मंदिर उभारणीच्या माध्यमातून ५०० वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण झाले. अयोध्येत राममंदिर व्हावे आणि काश्मीरमधून ३७० कलम हटवावे, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ही इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ‘फेक नरेटिव्ह’ पसरविण्याचे काम झाले. त्यामुळे त्या निवडणुकीत कमी जागा मिळाल्या होत्या; मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही बाजी मारल्याचे शिंदे म्हणाले. श्रीरंग बारणे यांचा नगरसेवक ते महासंसदरत्न हा जीवनपट पाहिला तर त्यांच्या ‘संघर्षयोद्धा पुस्तकाचे नाव समर्पक वाटते.
Tags: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबाला ३२ लाखांची मदतएकनाथ शिंदेखासदार श्रीरंग बारणेलाडकी बहीण योजना























Join Our Whatsapp Group