पिंपरी (Pclive7.com):- नागरिकांचे सोईकरीता पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एक विशेष मोबाईल क्रमांक जारी केला आहे. 8087705112 हा विशेष मोबाईल क्रमांक जारी करण्यात आला असून सदरचा मोबाईल क्रमांक हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, विशेष शाखा-२ येथील वरिष्ठ अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली हाताळला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींची थेट दखल आता पोलीस आयुक्तालयातून घेतली जाणार आहे.

दि.२६/०३/२०२५ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयक्त विनयकुमार चौबे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचा वापर करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. मंगळवारी त्यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून नागरिकांच्या प्रश्नांना, अडचणींना आणि सूचना उत्तरे देत व्हर्चुअल टाउन हॉल-२ च्या माध्यमातून खला संवाद साधला.
या कार्यक्रमा दरम्यान सार्वजनिक ठिकाणी अनुशासन, महिलांची सुरक्षितता, वाहतूक समस्या, सायबर गुन्हे यांसारख्या विविध विषयांवर नागरिकांनी थेट प्रश्न विचारले असता पोलीस आयुक्तांनी अत्यंत दिलखुलासपणे सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. पासपोर्ट पडताळणीच्या अनुषंगाने नागरिकांनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी 8087705112 हा विशेष मोबाईल क्रमांक त्वरित जारी केला. पासपोर्ट व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राचे अनुषंगाने अडवणूक व दिरंगाई याबाबत नागरिकांनी त्वरीत उपरोक्त नमुद मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपल्या समस्यांचे निराकरण करावे असे आवाहन केले. सदरचा मोबाईल क्रमांक हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, विशेष शाखा-२ येथील वरिष्ठ अधिकारी यांचे मार्फतीने हाताळला जाणार आहे.
























Join Our Whatsapp Group