भोसरीच्या उत्सवामध्ये 5 महाराष्ट्र केसरी, 15 राष्ट्रीय पैलवानांची उपस्थिती; महाराष्ट्र केसरी मोहोळ विरुद्ध भारत केसरी दहिया यांच्यात तगडी लढत
भोसरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराची कुस्ती पंढरी असणाऱ्या भोसरीमध्ये यंदा श्री. भैरवनाथ महाराजांचा उत्सव भारत केसरी आणि महाराष्ट्र केसरी यांच्या लक्षवेधी कुस्तीने गाजणार आहे. यंदा कुस्ती मैदानात “भैरवनाथ केसरी” किताबासाठी भारत केसरी वीरेंद्र दहिया आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत होणार असून, या लढतीकडे कुस्ती शौकिनांचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्यातील हा सर्वात मोठा कुस्ती आखाडा होणार आहे.
भोसरीचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ महाराजांचा उत्सव दि. १५ व १६ एप्रिल रोजी साजरा करण्यात येत असून, बुधवारी (१६ एप्रिल) दुपारी ४ वाजता आखाडा पूजन करुन लढतींची सुरूवात होईल. कै. सदाशिवराव रामभाऊ फुगे कुस्ती आखाड्यात कै. ह.भ.प. रामचंद्र बाबुराव लांडगे (वस्ताद), कै. पै. सुदाम रामचंद्र लांडगे यांच्या स्मरणार्थ भैरवनाथ केसरी मानाची गदा आणि ३ लाख रुपये रोख बक्षीस घोषीत केले आहे. “भैरवनाथ केसरी’ किताबासाठी पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध भारत केसरी वीरेंद्र दहिया यांच्यात सामना होईल. पैलवान मोहोळ यांच्यासोबत महाराष्ट्रात कोणताही मल्ल खेळण्यास तयार नाही. त्यामुळे पंजाबचा भारतकेसरी दहिया याने आव्हान स्विकारले असून, ही लढत लक्षवेधी होणार आहे.
भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त दरवर्षी कुस्तीचा आखाडा लक्षवेधी ठरतो. यंदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्ल यंदा आखाड्यात भिडणार आहेत. हिंद केसरी, भारत केसरी, ऑल इंडिया चॅम्पियन, एशियन चॅम्पियनसह महाराष्ट्र केसरी मल्लांच्या कुस्त्या पाहण्याचा आनंद कुस्ती शौकिनांना घेता येणार आहे. 5 महाराष्ट्र केसरी, भारत केसरी आणि 15 हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील नामांकीत कुस्तीपटू या आखाड्याला उपस्थित राहणार आहेत. विजेत्याला चांदीची गदा आणि 12 लाखापेक्षा अधिक रकमेच्या बक्षिसाने सन्मानित करण्यात येणार आहे.
आमदार महेश लांडगे, युवा नेते नितीन बाळासाहेब लांडगे यांच्या वतीने चांदीची गाथा आणि तीन लाखाचे विशेष इनाम देऊन गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायवाड यांचीही कुस्ती महाराष्ट्रात पाहिल्यांदा बघायला मिळणार आहे. सामाजिक कार्यकर्ते दत्ता गव्हाणे, पै. योगेश लांडगे, पै. धनाजी लांडगे आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक पठारे यांच्या पुढाकाराने ही कुस्ती होणार आहे. यासोबतच मानाच्या सात गदांसाठी निश्चित केलेल्या २० प्रमुख लढती होणार आहेत. विशेष म्हणजे, ग्रामस्थांच्याही काही कुस्ती होणार आहेत.
भोसरीतील सर्व ग्रामस्थ आणि वडिलधारी मंडळी परंपरेप्रमाणे एकोप्याने उत्सव साजरा करीत आहेत. कुस्ती आखाडा आणि बैलगाडा शर्यती उत्सवामध्ये लक्षवेधी होणार आहेत.
भोजापूर अर्थात भोसरी ही कुस्ती शौकिनांची पंढरी आहे. महाराष्ट्र केसरी किताबाची लढत देखील या आखाड्यात झालेली आहे. कोणताही खेळ हा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दुवा आहे. त्यामुळे भोसरीमध्ये कुस्ती केंद्र देखील उभारले जात आहे. शहरातून जास्तीत जास्त युवक खेळामधून पुढे जातील करिअर घडवतील यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. गावकी-भावकीमध्ये एकी असून, उत्सव अत्यंत दिमाखात साजरा होत आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.