भोसरी (Pclive7.com):- अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका तडीपार आरोपीला अटक केली आहे. चऱ्होली येथील दाभाडे सरकार चौकाजवळ मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासमोर ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून ५ लाख ३३ हजार ९०० रुपयांचा ९ किलो ४७८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

भरत दशरथ वाघमारे (३९, रा. राहु पिंपळगाव, ता. दौंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे (गुन्हे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी अंमली पदार्थाच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी पथके तयार केली होती. सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार किशोर परदेशी, मयुर वाडकर, गणेश कर्पे, विजय दौंडकर, निखिल वर्षे यांचे पथक चऱ्होली बुद्रुक परिसरामध्ये गस्त घालत होते. त्या वेळी त्यांना दाभाडे सरकार चौकाजवळ एक व्यक्ती दुचाकीवर पांढऱ्या हिरव्या रंगाचे नायलॉनचे पोते ठेवून संशयितरीत्या थांबलेली दिसली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याला चाकण पोलिसांनी तडीपार केले आहे. त्याच्या दुचाकीची तपासणी केली असता पोत्यामध्ये गांजा आढळून आला. पोलिसांनी पाच लाख ३३ हजारांचा ९ किलो ४७८ ग्रॅम गांजा आणि दुचाकी जप्त केली. आरोपी भरत वाघमारे याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात दोन आणि खडक पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार किशोर परदेशी, मयुर वाडकर, गणेश कर्पे, विजय दौंडकर, निखिल वर्षे व रमेश कारके यांच्या पथकाने केली आहे.